बेळगाव : धर्मासाठी बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचा आज अंतिम दिवस आहे. या निमित्ताने बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यादरम्यान एका पोलिस श्वानाने महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात देखील यानिमित्ताने विशेष पूजा पार पडली. दर महिन्याच्या २८ आणि २९ तारखेला पोलिस दल कपिलेश्वर मंदिर परिसरात नियमित तपासणीसाठी येत असते. आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास असल्याने, कपिलेश्वर मंदिरात प्रतिमेची पूजा करण्यात आली होती. विशेष म्हणजे, यादरम्यान पोलिस दलासोबत असलेल्या श्वानाने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत अभिवादन केले. या भावनिक क्षणाची परिसरात मोठी चर्चा झाली असून, हे दृश्य पाहून शिवभक्त भारावून गेले.