
संजीवीनी फौंडेशनच्या वतीने होनग्यात आरोग्य मार्गदर्शन शिबिर
काकती : रजोनिवृत्ती काळात स्त्रीच्या आरोग्याची जबाबदारी कुटुंबाची असते असे विचार सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजुषा गिजरे यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संजीवीनी फौंडेशनच्या वतीने आरोग्य जागृती मास पाळण्यात येत आहे.
आठ मार्चपासून गर्भाशयाचे विकार, स्तनांचा कर्करोग या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यावेळी बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील महिलांसाठी रजोनिवृत्ती या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर होनगा ग्रामपंचायत अध्यक्षा जिजाबाई धुडूम, दिपज्योती फौंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा ज्योती गवी आणि डॉ. मंजुषा गिजरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत जनसंपर्क प्रमुख पद्मा औशेकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

स्त्रियांच्यात होणाऱ्या हार्मोनल असंतुलनामुळे चिडचिड होणे, अंग दुखणे, झोप न येणे भूक न लागणे थकवा किंवा ऊर्जेचा अभाव, वजन वाढणे किंवा कमी होणे, मूड स्विंग्ज आणि डिप्रेशन, अनियमित मासिक पाळी असे प्रकार घडत असतात.
रजोनिवृत्ती म्हणजे काय तर मासिक पाळी बंद होण्याचा काळ, रजोनिवृत्तीचे निदान कसे करावे, आहार विहारात कोणता बदल करावा याबद्दलची सविस्तर माहिती डॉ. गिजरे यांनी दिली.
रजोनिवृत्ती लवकर होऊ नये म्हणून परदेशात अनेक क्लुप्त्या काढल्या जात आहेत पण जर का रजोनिवृत्तीचा काळ ५५ ते ६० वर्षांपर्यंत लांबला तर कर्करोगाचा धोका उदभवू शकतो, तुमची मासिक पाळी आठवड्याभरापेक्षा जास्त काळ चालू असेल पाळीमधील अंतर कमी होत असेल मासिक पाळी दोन तीन महिने आलीच नाही तर तुम्ही महिलांनी डॉक्टरांशी संपर्क साधून आपल्याला जाणवत असलेल्या लक्षणांबद्दलची माहिती देऊन योग्य तो सल्ला घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी प्रमुख पाहुण्या ज्योती गवी यांनी आपले विचार व्यक्त करताना आजकाल स्त्रिया सरकारच्या योजना काय आहेत याची पहिला विचारपूस करताना दिसतात पण आपल्या आरोग्याविषयी अनभिज्ञ असतात. हल्ली महिला असुरक्षित असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. यासाठी आपल्या मुलींना शालेय जीवनातच स्वसंरक्षणासाठी तयार केले पाहिजे तसेच त्यांना चांगला स्पर्श वाईट स्पर्श काय असतो यांनीसुद्धा जाणीव करून दिली पाहिजे असल्याचे सांगितले.
शेवटी उपस्थित महिलांच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.
प्रत्येकानी डॉ गिजरे यांना रजोनिवृत्ती बाबत अनेक प्रश्न विचारले, त्यांना समजेल अशा भाषेत डॉ गिजरे यांनी माहिती दिली.
यावेळी होनगा गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मिताली कुकडोळकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta