
कर्तृत्वशाली नेतृत्वाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले येळ्ळूरचे सुपुत्र आणि सीमाभागातील सामाजिक, राजकीय, चळवळीतील बहुआयामी व्यक्तीमत्त्व लाभलेले श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक -अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुर सर यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त थोडक्यात…..
बेळगावातील येळ्ळूर हे क्रांतिकारकांचे, शिक्षण-संस्थापकांचे, शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावी सरांचा जन्म एका गरीब कुटुंबात 2 एप्रिल 1943 साली झाला. सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येळ्ळूर येथेच झाले. माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालयात घेत असताना ते एक हुशार विद्यार्थी म्हणून गणले जात होते. पुढील शिक्षण बेळगाव येथील सेंट्रल स्कूल, जीएसएस मधून बी.एस्सीचे शिक्षण कोणतीही गावापासून वाहनाची सोय नसताना कधी पायपीट तर कधी सायकलवरून जिद्दीने पूर्ण केले. श्री. वाय. एन. मजुकर सरांना बालपणीच गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळी यांचा सहवास लाभला. त्यांच्यासोबत सरांनी सर्वप्रथम पिरनवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलची स्थापना केली. त्यानंतर बेळगुंदी, गर्लगुंजी अशा अनेक ठिकाणी विश्वभारत सेवा समितीची हायस्कूले चालू केली व त्या ठिकाणी विद्याज्ञानाचे कार्य केले. अनेक विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य सुरू ठेवले.
सरांचे वडील कै. नारायण परशराम मजुकर हे 1953 साली येळ्ळूर ग्रामपंचायतचे सदस्य होते. त्यावेळी ते न्यायदानाच्या कार्यात अग्रेसर होते. त्यामुळे सरांना बालपणापासून सामाजिक, राजकीय क्षेत्राची आवड निर्माण झाली व आजपर्यंत तोच वसा अखंडपणे सुरू आहे. सामाजिक कार्यात सर चतुरस्त्र असून पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते आहेत. सरांनी एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून सुरुवातीला 10 वर्षे तरुण भारत, 20 वर्षे पुढारीमध्ये उत्तम कामगिरी केली. दरम्यान अनेक वैचारिक व प्रासंगिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लेख प्रसिद्ध केले. त्याचप्रमाणे समाजाची बांधिलकी म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते म्हणून उल्लेखनीय कार्य केले. मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी या विचारातून सरांनी 1975 साली श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना करून श्री चांगळेश्वरी हायस्कूल सुरू केले. त्यानंतर 1990 पासून खानापूर तालुक्यातील दुर्गम खेड्यात जंगलात जिथे शिक्षणाचा विकास नाही अशा मणतुर्गा, लोकोळी, कारलगा, शिवठाण गणेबैल या ठिकाणी शाळा चालू केल्या व येथील मुला-मुलींची शैक्षणिक सोय करून दिली. पुढे सरांनी 2024 साली शिक्षकांची आर्थिक बाब मजबूत व्हावी यासाठी श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ नोकर संघाची स्थापना केली. त्याचप्रमाणे गरीब विद्यार्थी आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्याला आर्थिक मदत व्हावी यासाठी गुरुवर्य श्री. वाय. एन. मजुकर फाउंडेशनची स्थापना केली. सरांच्या या कार्यात नेहमीच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कांचन मजुकर मॅडम यांची मोलाची साथ लाभली. जशी रथाला दोन चाके तशीच या दाम्पत्याची एकमेकांना भक्कम साथ लाभली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सुखादीन आयुष्याला पाठ फिरवून एक निष्ठेने शिक्षण दानाचे कार्य स्वीकारले. त्या कार्याचा वसा श्री. वाय. एन. मजुकर सरांनी सतत तेवत ठेवला म्हणून सरांना शतशः धन्यवाद!! त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा!!!
– आर. बी. पाटील
मुख्याध्यापक, गणेबैल, हायस्कूल गणेबैल
Belgaum Varta Belgaum Varta