
बेळगाव : 1 जून 1986 रोजी झालेल्या कर्नाटक -महाराष्ट्र सीमावादाच्या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे भव्य हुतात्मा “स्मृती भवन” उभारण्यात येणार आहे. मात्र मराठीची कावीळ असलेल्या काही कन्नड संघटनांचे म्होरके कर्नाटक प्रशासनाला हाताशी धरून या हुतात्मा स्मृती भवनाच्या उभारणीवर आडकाठी घालत आहेत. नुकताच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हुतात्मा स्मृती भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. या तीन मजली स्मृती भावनात सीमा लढ्याचा इतिहास जपण्यात येणार आहे. हुतात्म्यांच्या स्मृती, अनेक ऐतिहासिक छायाचित्रांचे संकलन या भवनामध्ये केले जाणार आहे. जेणेकरून पुढील पिढीस सीमा लढ्याची माहिती मिळेल मात्र या स्मृती भवनाच्या उभारणीला काही कन्नड संघटनांकडून तसेच कन्नड संघटना कृती समितीकडून जोरदार विरोध दर्शविला जात आहे. कृती समिती अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी हिंडलगा येथे उभारण्यात येणाऱ्या स्मृती भावनाला विरोध दर्शवत जिल्हा प्रशासनाने सदर जमिनीला बिगर शेती करण करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा लढ्यात हुतात्मे पत्करलेल्या हुतात्म्यांच्या बलिदानाचा राजकीय फायदा घेत असून स्मृती भवनाचा वापर लोकांना भडकवण्यासाठी करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली असून हुतात्मा स्मृती भवनाच्या उभारणीवर प्रशासनाची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीमा लढ्यासाठी हुतात्म्या पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणासाठी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला विरोध दर्शवून पुन्हा एकदा कन्नड संघटनांनी बेळगावातील मराठी जनते प्रती असलेला आपला पक्षपातीपणा दाखवून दिला आहे. या कन्नड संघटनांच्या दबावाला बळी पडत प्रशासनाने जर हुतात्मा स्मारकाच्या निर्मितीत आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती भविष्यात मोठे आंदोलन उभे करेल, असा इशारा माजी आमदार मनोहर किनेकर यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta