बेळगाव : औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी योग्य नसल्याचे मत प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि केंद्रीय साहित्य अकादमीचे मराठी भाषा समन्वयक विश्वास पाटील यांनी येथे व्यक्त केले.
सपना बुक हाऊस, बेळगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी हे एक अतुलनीय वीर होते, असे मत व्यक्त केले.
पूर्वी लोकांना संभाजीबद्दल योग्य आणि खरी माहिती नव्हती. छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी गैरसमज निर्माण करण्याचे काम करण्यात आले. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहास देशाला कळाला. ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याने लोकांमध्ये जागृती नवचैतन्य निर्माण झाले असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विश्वास पाटील यांनी यावेळी आपल्या पुस्तक लेखनाबद्दल उपस्थित वाचकांशी संवाद ही साधला.
त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘महानायक’ या चरित्रात्मक कादंबरीची पहिली प्रत साहित्यिक आणि धर्मदाय विभागाचे निवृत्त अधिकारी रवी कोटारगस्ती यांना भेट दिली.
विश्वास पाटील यांना कन्नड साहित्यिकांच्या वतीने प्रसिध्द लेखक व पत्रकार डॉ. सरजू काटकर यांनी सत्कार केला. नाटककार डॉ.डी.एस. चौगले, बाबुराव नेसरकर, प्रा.घोरपडे यांनी यावेळच्या चर्चेत भाग घेतला. सपना बुक्सच्या वतीने रघु यांनी स्वागत केले. युवा कवयित्री नदीमा सनदी यांनी आभार मानले.