बेळगाव : बेळगावात श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावात श्रीरामसेना हिंदुस्थानसह विविध हिंदूपर संघटनांनी श्रीराम नवमीचा उत्सव अत्यंत जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढली.
प्रभू श्रीरामचंद्र, रामभक्त हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सजीव देखाव्यांसह मिरवणूक निघाली. या शोभायात्रेत विविध पारंपरिक वाद्यवृंद सहभागी झाले होते. देखाव्यांच्या पुढे ध्वजपताका, दीप नृत्य, ढोलताशा आणि हलगी वादनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून प्रारंभ झाला. राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, छत्रपती धर्मवीर संभाजीराजे चौक, किर्लोस्कर रोड, शनिमंदिर, श्री कपिलेश्वर उड्डाणपूल, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मार्ग मार्गे ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात समाप्त झाली.
बेळगावातील श्रीराम नवमीची शोभायात्रा ही आगळीवेगळी ओळख निर्माण करणारी असते. यामध्ये हिंदू, दलित आदी विविध समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. बेळगावमध्ये आयोजित शोभायात्रेत तरुणांसह आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता.