
बेळगाव : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे.
बेळगावच्या शिवबसव नगर येथील एका वसतिगृहात ही घटना घडली. प्रज्वल अण्णासाहेब कुप्पानट्टी (वय 20, मूळ रा. बुवाची सौंदत्ती, तालुका रायबाग सध्या रा. शिवबसवनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्वल हा बेळगावातील एका नामांकित कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. शिवबसवनगर परिसरातील वसतिगृहात रहात होता. काल कॉलेजला न जाता आपल्या खोलीत थांबल्याचे सांगण्यात येत आहे. संध्याकाळी मित्राने येऊन खोलीचा दरवाजा ठोठावला असता प्रज्वलने दरवाजा उघडला नाही. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर प्रज्वलने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. प्रज्वलच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
माळमारुती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला व मृतदेह बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta