बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे साजरी करण्यात आली.
अध्यक्ष अंकुश केसरकर आणि श्री. शेखर तळवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, बाबासाहेबांनी लोकशाही बळकट करण्यासाठी चिन्हाकडे न पाहता माणसाकडे पाहून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे सांगितले होते. आजच्या काळात याची आवश्यकता असून जर देशाची प्रतिमा विश्वगुरुप्रमाणे घडवायची असेल तर बाबासाहेबांच्या या विचारांवर आज चालायची गरज आहे. तसेच सिमालढा आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची तत्वे आखून दिली आहेत त्यानुसारच लढला जात आहे आणि याच लोकशाही मार्गाने न्याय नक्की मिळेल अशी आशा व्यक्त केली.
युवा समितीचे पदाधिकारी अश्वजित चौधरी यांनी बाबासाहेबांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेतला. बाबासाहेबांचे कार्य हे फक्त एका विशिष्ट वर्गासाठी नसून सर्व भारतीयांना नवीन दिशा देणारे आणि माणसाला माणूस म्हणून अधिकार मिळवून देणारे होते असे सांगितले.
यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, किरण हुद्दार, सुरज कुडूचकर, राकेश सावंत, आकाश भेकणे, प्रतीक पाटील, शाम किरमटे आदी उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी आभार प्रदर्शन केले.