बेळगाव : बेळगावात संविधान शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.
बेळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा पंचायत, समाजकल्याण विभाग आणि विविध दलित संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, खासदार जगदीश शेट्टर, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक रामनगौड कन्नोळी तसेच अनेक दलित नेते आणि मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी भीमज्योतीसह आगमन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर समता सैनिक दलातर्फे बुद्ध वंदना आणि भीम वंदना सादर करण्यात आली.
खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, एक सामान्य व्यक्तीदेखील देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, ही संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे मिळाली आहे. समतेचा मंत्र संविधानात आहे आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या, भारताचे संविधान संपूर्ण जगात आदर्श मानले जाते, असे गौरवोद्गार काढले. त्यांनी असेही सांगितले की, अशा श्रेष्ठ संविधानाचा शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या गौरवाने साजरी केली जात आहे.
खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी भारताची प्रगती, बळकटी आणि जागतिक स्तरावरील उन्नती यांचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानालाच जाते असे सांगितले. हे संविधान मानवी मूल्ये, सामाजिक समतेचे तत्त्व आणि राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत प्रभावी आहे, असे ते म्हणाले.
आमदार आसिफ सेठ बोलताना म्हणाले, बाबासाहेबांनी केवळ दलितांसाठीच नव्हे, तर सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी संविधानात संधी निर्माण केली आहे. मात्र सध्या भाजपकडून संविधानात बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, देशातील अस्पृश्यता, अन्याय यांविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे बाबासाहेब होते. संविधानामुळेच देश प्रगतीच्या मार्गावर आहे, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नागरिकांनी संविधानाचे तत्त्व अंगीकारून देशाच्या प्रगतीसाठी सतत काम करावे, असे आवाहन केले. बाबासाहेबांची जयंती ही एक महापर्वासारखी साजरी व्हावी, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला दलित नेते मल्लेश चौगुले, महाराष्ट्र एकीकरण समितीचे व श्रीराम सेनेचे प्रतिनिधी रमाकांत कोंडूस्कर, शेतकरी नेते सिद्धगौड मोदगी, किरण हुद्दार, शेखर तळवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे मिरवणुकीचे आयोजनही करण्यात आले होते.