बेळगाव : येळ्ळूर येथील कलमेश्वर गल्ली, कलमेश्वर मंदिर परिसर तसेच विराट गल्ली परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या रस्त्याशेजारील विद्युत खांब खराब झाले होते. तसेच त्यावरील विद्युत तारा देखील जीर्ण झाल्या होत्या. मागील 40 वर्षापासून या तारा बदलल्या गेल्या नव्हत्या. लोंबकळणाऱ्या तारा घरांवर आल्यामुळे धोका निर्माण झाला होता. ही बाब वॉर्ड क्रमांक 2 चे ग्रामपंचायत सदस्य श्री. रमेश मेणसे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत निवेदन दिले होते.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत कार्यनिर्वाहक अभियंते श्री. विनोद केरूर, सहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंते श्री. दीपक सर, तसेच सेक्शन ऑफिसर लोबो, वाणी मॅडम, त्याचप्रमाणे येळ्ळूर गावचे लाईनमन सदा यांच्या सहकार्याने कलमेश्वर गल्ली, विराट गल्ली परिसरातील विद्युत खांब व विद्युत तारा बदलण्यात आल्या. त्याचप्रमाणे घरांवर लोंबकळणाऱ्या तारा बाजूला करून घेण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, शुभम जाधव उपस्थित होते.