
बेळगाव : बेळगावात आज भाजपच्या वतीने काँग्रेस सरकारच्या विरोधात ‘जनआक्रोश यात्रा’ काढण्यात आली. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले, देशातील कोणत्याही उद्योजकाला जमणार नाही अशी संपत्ती आणि कर्तबगारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘यंग इंडिया ट्रस्ट’च्या माध्यमातून साध्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक तपास धोरणामुळे ‘यंग इंडिया ट्रस्ट’मधील मोठा भ्रष्टाचार समोर आला असून, हाच काँग्रेसच्या विकासाचा नमुना आहे, असा घणाघात त्यांनी केला. भ्रष्टाचारासाठी आणि भ्रष्टाचाराच्या हेतूनेच जन्मलेला पक्ष म्हणजे काँग्रेस असल्याचे सांगून, ६० वर्षे देशावर राज्य केलेल्या काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राशी संबंधित मोठ्या घोटाळ्यात सहभाग घेतला आहे, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणाचा उल्लेख करून विजयेंद्र यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, “मुख्यमंत्री सिध्दरामय्या आपल्या खुर्चीचे रक्षण करण्यासाठी दरवाढीच्या माध्यमातून राज्याची लूट करत आहेत. तर डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री पद हाती मिळवण्यासाठी दिल्लीला एटीएमसारखे हजारो कोटी रुपये पाठवत आहेत. या त्यांच्या भ्रष्ट कारवायांकडे पाहणारं कोणी आहे का? राज्यात गृहमंत्री कोण आहेत हेच लोकांना माहीत नाही. कोणताही मंत्री महिन्यातून एकदा तरी गैरसमज किंवा कारभारातील त्रुटींबाबत तक्रार करत नाही, असा एकही महिना जात नाही. काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार नाही, हीच सहावी हमी असल्याची टीका आर. अशोक यांनी केली.
माजी मंत्री श्रीरामुलू म्हणाले, एकाच समाजाला खुश करण्यासाठी जातनिहाय जनगणना अहवाल लागू करण्यासाठी शिफारस केली जात असून आरक्षण मिळवण्यासाठी पंचमसाली समाजाने केलेल्या मागणीवर लाठीमार करण्यात आला. सरकारने पंचमसाली समाजाचेच नव्हे, तर कित्तूर राणी चन्नम्माच्या वंशजांचा अपमान केल्याचे ते म्हणाले.
खासदार यदुवीर वोडेयार म्हणाले की, राज्य सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे आणि घोटाळे वाढत आहेत. ते त्यांच्या सर्व अपयशांसाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. कोणताही प्रकल्प पूर्णपणे राबविला जात नाही. एका प्रगतीशील राज्याला आता मागासलेले राज्य म्हणून ओळखले जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
आमदार अभय पाटील म्हणाले की, राज्य सरकारने सत्तेत आल्यापासून जनतेला भिक्षा दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मनाप्रमाणे जातनिहाय जनगणना केली आहे. मराठा समाजावर अन्याय झाला आहे. विकास शून्य आहे आणि बेकायदेशीर गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. गुन्हेगारांशी हातमिळवणी करणारे हे सरकार फार काळ टिकणार नाही आमच्याकडे सर्व अधिकाऱ्यांचा हिशेब आहे ज्यांनी जनतेसाठी हानिकारक असे काम केले. आमचे सरकार सत्तेत आल्यावर त्यांना दोषमुक्त केले जाईल असे अभय पाटील यांनी सांगितले.
कर्नाटकात ५ वर्षे पूर्ण केल्यानंतर, पुन्हा तेच सरकार सत्तेत येत नाही. जनता पुढच्या वेळी भ्रष्ट सरकारला संधी देणार नाही. २०२८ मध्ये भाजप सत्तेत येईल हे १०० टक्के निश्चित आहे. भाजप सरकार गरीब आणि मध्यमवर्गासह सर्व वर्गांच्या कल्याणासाठी काम करेल अशी प्रतिक्रिया अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
यावेळी छलवादी नारायणस्वामी, खासदार जगदीश शेट्टर, आमदार विठ्ठल हलगेकर, आमदार दुर्योधन ऐहोळे, शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटागीमठ, भाजप शहराध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, राज्य भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta