बेळगाव : बृहन्मुबई विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीने डाॅ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धा – 2024-25 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या सृजन पाटील यांने सुवर्ण पदक पटकाविले आहे.. ही एक आगळीवेगळी स्पर्धा असून वर्षभर मुलांना वेगवेगळी प्रात्यक्षिक करून आपला अहवाल मुलाखतीच्या माध्यमातून मांडावा लागतो.
या स्पर्धेसाठी मराठी विद्यानिकेतन, बेळगाव या शाळेने सहावी व नववीमधून 64 विद्यार्थी परीक्षेला बसवले. यातून अनेक विद्यार्थी पास झाले….पण पुढील practical फेरीसाठी सहावीतील 5 विद्यार्थी निवडले गेले. ही शाळेसाठी अभिमानाची गोष्ट होती. आणि अंतिम फेरीसाठी कु.सृजन अनिल पाटील हा पात्र ठरला. “दृष्टीहिनांसाठी वनदृष्टी” या कृतीसंशोधनाचा विषय निवडून सृजनने मुलाखत फेरी पार करून यशस्वीरित्या सुवर्णपदकापर्यंत आपली झेप घेतली. या दैदिप्यमान कामगिरीमुळे शाळेच्या गौरवात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दि.12 एप्रिल 2025 रोजी अखिल भारतीय नाट्य परिषद, मुंबई या ठिकाणी झालेल्या बक्षिस वितरण समारंभामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक, रोख रक्कमव प्रशस्तीपत्र देवून त्याचा सन्मान करण्यात आला.
मे 3, 4, 5 या कालावधित बारामतीमध्ये समर कॅम्प होणार आहे. त्यामध्ये विविध वैज्ञानिक मंडळींसोबत राहायची संधी त्याला मिळणार आहे. यासाठी त्याला शाळेचे मुख्याध्यापक श्री.जी.व्ही. सावंत, श्री.एन.सी. उडकेकर, शिक्षण संयोजिका नीला आपटे यांची प्रेरणा मिळाली. ज्येष्ठ शिक्षक व मार्गदर्शक श्री.प्रतापसिंह चव्हाण, मत्स्यालय महाविद्यालय,रत्नागिरीच्या प्राध्यापिका श्रीमती स्वप्नजा मोहिते, शाळेचे विज्ञान शिक्षक, श्वेताताई, मंजुषाताई, अरूण बाळेकुंद्री सर तसेच त्याचे आईबाबा सौ. शैला पाटील व श्री.ए.के. पाटील यांचेही विशेष मार्गदर्शन मिळाले. सृजनाच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta