

येळ्ळूर : येळ्ळूर गाव हे सैनिक आणि शिक्षकांचे गाव आहे, या गावांमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, इतिहास घडविणारे हे गाव आहे. तालुक्यातील इतर गावांनी या गावाचा आदर्श घ्यावाच लागेल. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा या गावाने दिलेले योगदान आम्हाला विसरता येणार नाही. शिक्षणाच्या विचाराने पुढे जाणारे हे गाव मला खूप भावले. सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांचा आदर्श आपल्याला घ्यावाच लागेल, त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने सार्वत्रिक शिक्षणाची बीजे रोवली गेली. येळ्ळूरच्या या शाळेला 150 वर्षे पूर्ण झाली, ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक सेवा देणे ही काय साधी गोष्ट नाही. त्यामुळे या शाळेत कार्य केलेल्या शिक्षकांचे व शिकलेल्या विद्यार्थ्यांचेही त्यांनी आभार मानले. व या गावात पुन्हा एकदा मला येण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो, असे उद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने काढले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील होते. तर व्यासपीठावर माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार अरविंद पाटील, दिगंबर पाटील, तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, ॲड. इनामदार, युवा नेते आर. एम. चौगुले, बसवणगौडा पाटील, स्वागताअध्यक्ष एन. डी. गोरे, गौरवाध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी, एसडीएमसी अध्यक्षा रूपा धामणेकर, उपाध्यक्ष जोतिबा उडकेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी पहेलगाम मध्ये बळी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. प्रभाकर कोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन प्रा. आनंद मेणसे व महांतेश कवटगीमठ यांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रकाश मरगाळे, गावडोजी गुरुजी प्रतिमा पूजन अरविंद पाटील यांनी तसेच गुरुवर्य शामराव देसाई प्रतिमा पूजन रमाकांत कोंडुस्कर यांनी केले.
डॉ. प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी यांनी केले. स्वागता अध्यक्ष एन. डी. गोरे यांनी उपस्थिततांचे स्वागत केले. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार सतीश पाटील, एन. डी. गोरे व रावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या चित्रफीतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले.
शरद पवार पुढे म्हणाले की, 150 वर्षे ग्रामीण भागात शिक्षण सेवा देणे ही सामान्य बाब नाही. येथे शिकलेली मुले देश-विदेशात आपली छाप पाडत आहेत, आणि येळ्ळूरचा गौरव वाढवत आहेत. हे सर्व येथे कार्यरत शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचे राज्य आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. तेथे सर्वांना समान हक्क दिले गेले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन, सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळावा, हीच खरी भावना आहे. येळ्ळूर ही लढवय्यांची भूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे शैक्षणिक क्रांती सुरूच आहे. त्या काळी अक्षरदायिनी सावित्रीबाई फुले यांनी सहन केलेल्या संघर्षामुळे आज महिला शिक्षकांना शिक्षण सेवेसाठी संधी मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर म्हणाल्या, येळ्ळूरवाशीयांनी 150 वर्षे पूर्वीची शिक्षण संस्था टिकवून ठेवून त्या शाळेचा दिवसेंदिवस विकास केलात त्याबद्दल तुमची किती प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. ज्यावेळेला मी राजकारणात आले तेव्हा मला मराठी काहीच येत नव्हते पण तुम्हा सर्व लोकांचे प्रेम आणि विश्वासामुळेच मी मराठी शिकले, राजकारणात मी सुरुवातीला आले तेव्हा, मी पवार साहेबांचे नाव घ्यायचे व बेळगावचे बारामती करतो असे आश्वासन द्यायचे, पण मी बारामती बघितलेच नव्हते. पण सध्या मी लोकांच्या मनामध्ये बारामती निर्माण केली आहे. राजहंसगडावर मी 52 फुटांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा उभा केला आहे.
प्रमुख वक्ते माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनीही शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, त्याचबरोबर पाचव्या शतकापासून ते आतापर्यंतचा शैक्षणिक प्रवास त्यांनी विशद केला. सूत्रसंचालन सातेरी पाखरे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक बबन कानशिडे यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta