
बेळगाव : दहावीच्या बोर्ड परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज मराठी विद्यानिकेतन येथे पार पाडण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व उपाध्यक्ष श्री. सुरेश पाटील, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सिव्हिल इंजिनियर शुभम अतिवाडकर, सीए स्वप्निल पाटील, ॲड. तृप्ती सडेकर, आर्किटेक्ट प्रतिज्ञा पाटील व आर्टिस्ट अमोल चौगुले अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी केले. विज्ञान शिक्षिका सविता पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थी अमोल चौगुले व प्रतिज्ञा पाटील यांनी आपली मते व्यक्त केली. यांनी मुलांना स्वतःची आवड ओळखून शिक्षणाचे मार्ग निवडा, स्वतःची कला जोपासा असा मौलिक सल्ला दिला. तसेच प्रसाद मोळेराखी व श्रेया धामणेकर या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याविषयी आपली मनोगते मांडली. सुभाष ओऊळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व मुलांना शुभेच्छा दिल्या. विशेष प्राविण्य मिळविलेल्या 14 विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सन्मानचिन्ह व पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या सृजन पाटील याला मार्गदर्शन केलेल्या प्रयोगशाळा प्रमुख श्वेता सुर्वेकर यांचा सत्कार तसेच राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या वेटलिफ्टिंगमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या वेटलिफ्टर कोच पूजा संताजी यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, दहावीचे शिक्षक सविता पवार, इंद्रजीत मोरे, सुरेश कुंदेकर, बी.एम्. पाटील, डी. एस. मुतगेकर, शिल्पा गर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. श्वेता सुर्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर शिल्पा गर्डे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta