
बेळगाव : बेंगळुरू येथील आर.सी.बी. विजयाच्या जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माफी मागितल्यास तो मोठा गुन्हा ठरणार नाही, असे मत श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले.
आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना मुतालिक म्हणाले की, आर.सी.बी.च्या विजयाच्या जल्लोषात घडलेली ही दुर्घटना दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करणे योग्य नाही. या घटनेची कुंभमेळ्यातील घटनेशी तुलना करणेही चुकीचे आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करणे शोभा देत नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधी पक्ष आणि जनतेचे म्हणणे ऐकून आपली चूक मान्य करून माफी मागितल्यास तो मोठा गुन्हा ठरणार नाही. या परिस्थितीत दोन्ही पक्षांच्या राजकारण्यांनी टीका करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. याशिवाय, क्रिकेटपटू कोट्यवधी रुपये कमावतात. मात्र, अशा घटना घडल्यावर त्यांनी उशिरा प्रतिक्रिया दिली, हे दुर्दैवी आहे. त्यांचे चाहते त्यांच्यासाठी मरण पावले आहेत. क्रिकेट समिती आणि खेळाडूंनी १ कोटी रुपये भरपाई दिल्यास ते चुकीचे ठरणार नाही. क्रिकेटच्या नावाखाली भरपूर लूट करून चाहत्यांच्या जीवावर ते जगत आहेत, त्यामुळे त्यांनी आता न्याय द्यायला हवा, असेही मुतालिक म्हणाले. या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असून, घाईघाईने जल्लोष आयोजित करून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही घटना घडली. याची जबाबदारी काँग्रेस सरकारनेच घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta