
बेळगाव : मागील दोन दिवसांपासून बेळगाव शहरात संततधार पावसाची सुरुवात झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी मंगळवारी शहराचा दौरा करून पाहणी केली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरात ठीकठिकाणी पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. गटारी व नाले तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना गैरसोयचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे शहरात ठीकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. सतत पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त शुभा बी. यांनी अधिकाऱ्यांसह बेळगाव शहरात पाहणी दौरा केला व महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांना तुंबलेल्या गटारी व नाले तात्काळ स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. शाहूनगर परिसरात पावसाने झाडांची पडझड झाली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तात्काळ झाडांच्या फांद्या हटवल्या तसेच भूमिगत गटारे व परिसरातील नाल्यांच्या स्वच्छतेसाठी तीन जेसीबी, दोन जेटिंग वाहने महानगरपालिकेकडून कार्यरत ठेवण्यात आली आहेत. जेणेकरून सांडपाण्याचा निचरा गटारीतून सुरळीत व्हावा पावसामुळे होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेने तीन पथके सज्ज केली असून पावसाळ्यात बेळगाव शहरात कोणतीही समस्या उद्भवल्यास त्वरित मदत दिली जाईल असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांना होणारा त्रास टळला असून महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांच्या कार्यतत्परतेमुळे बेळगाव शहरातील नागरिकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta