
बेळगाव : गोवावेस येथील अनुग्रह या हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यावेळी हॉटेलमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
हॉटेलमधील पेटणाऱ्या फर्निचरच्या आवाजाने जागे झालेल्या आसपासच्या लोकांनी आगीची माहिती हॉटेलचे मालक सुधाकर पुजारी यांना दिली. त्याचप्रमाणे तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधला. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह त्वरेने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत हॉटेलमधील टेबल खुर्च्या, काउंटर वगैरे संपूर्ण फर्निचरसह हॉटेलचे छत, इलेक्ट्रिक वायरिंग असे सर्व कांही जळून खाक झाले होते.
दुर्घटनाग्रस्त हॉटेल अनुग्रहचे मालक सुधाकर पुजारी यांनी घटनेची माहिती देऊन आगीमुळे हॉटेलचे सुमारे लाखों रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta