
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा रविवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा. संत मीरा शाळेच्या माधवाश्रम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. हिंदी देशभक्तीगीत आणि लोकगीत (मराठी/कन्नड) अशा दोन विभागात स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेमध्ये अधिकाधिक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन भाविपने केले आहे.
हिंदी विभागातील विजेत्यांना प्रथम पारितोषिक रोख ५,००० रूपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख ३,००० रूपये आणि तृतीय क्रमांक रोख २,००० रूपये तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी १,००० रूपये रोख देण्यात येतील. लोकगीत स्पर्धेसाठी आकर्षक स्मृतिचिन्हे देण्यात येतील. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत ६ वी ते १२ वी चे विद्यार्थी भाग घेऊ शकतील. समूहात कमीतकमी ६ आणि जास्तीतजास्त ८ विद्यार्थी असावेत. वाद्य संगतीकरिता अधिक ३ सहकाऱ्यांना मुभा असेल. विद्युत संचलित वाद्यांना परवानगी नाही. समूहगायनासाठी अधिकतम ७ मिनिटांचा कालावधी असेल. परिषदेतर्फे प्रकाशित ‘चेतना के स्वर’ या पुस्तकातीलच हिंदी गीत असले पाहिजे. लोकगीत कोणतेही चालेल. संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे. संगीतरचना, शब्दोच्चार, स्वर, ताल आणि एकूण प्रभाव अशी गुणांची विभागणी असेल. प्रथम क्रमांक प्राप्त शाळासमूह प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल. प्रांतविजेता दक्षिण भारत विभागीय स्तर आणि विभागीय स्तर विजेता राष्ट्रीय पातळीवर समूह गायन स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करेल.
अधिक माहितीसाठी ८७९२२५८४७७, स्पर्धाप्रमुख रजनी गुर्जर ९७४३४४१८२८ अथवा लक्ष्मी तिगडी ७०१९७२४२४८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे भाविपचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी कळविले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta