बेळगाव : समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखत शिपाई मामा-मावशी यांच्या हस्ते नूतनीकृत बालवाडी इमारतीचे उद्घाटन करून एक वेगळा आदर्श मराठी विद्यानिकेतन शाळेने निर्माण केला आहे.
दिनांक 24 जुलै रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेत बालवाडीच्या नूतनीकृत इमारतीचा उद्घाटन समारंभ साजरा झाला. विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी बालवाडीच्या विद्यार्थ्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. बालवाडीच्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
अंगणात फांदीवर
झाडाला झोपाळा
आत येऊन पहा कशी
छोट्यांची शाळा
या गोड बालगीताने बालवाडी शिक्षिका वरदा देसाई यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आनंदाचा, स्वागताचा आणि नव्या पर्वाचा हा उद्घाटन सोहळा ठरला.
‘वनसृष्टी ही माय माऊली’ या निसर्ग प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर सहदेव पवार व आशा चंद्रकांत जाधव यांची ओळख शाळेतील शिक्षिका कमल हलगेकर यांनी करून दिली. स्वच्छता कार्याविषयी आदर व्यक्त करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे किशोर पवार यांचे स्वागत शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, आशा जाधव यांचे स्वागत शिक्षण संयोजिका नीला आपटे, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांचे स्वागत सीमा कंग्राळकर, शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांचे स्वागत मराठी विद्यानिकेतन शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील यांनी केले. याप्रसंगी नूतनीकरणाचे काम केलेल्या इंटिरियर डिझायनर नमिता ताशिलदार यांचे स्वागत सुभाष ओऊळकर, सिव्हिल इंजिनिअर साईनाथ बडमंजी यांचे स्वागत प्रा. सुरेश पाटील व शाळेतील इलेक्ट्रिकल काम पूर्ण केलेले राहुल मंडोळकर यांच्या सहचारिणी ज्योती मंडोळकर यांचे स्वागत सीमा कंग्राळकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शाळेच्या नूतनीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
मराठी विद्यानिकेतन ही शाळा शाहू – फुले- आंबेडकर यांच्या विचारप्रेरणेने चालत असून शाळेचा इमारत उद्घाटन समारंभ शिपाई मामा, मावशी यांच्या हस्ते करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती, सेवाभाव यामुळेच हा उद्घाटन सोहळा विशेष ठरतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे किशोर सहदेव पवार व अशा चंद्रकांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन गौरी चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन बालवाडी शिक्षिका सुनीता पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शाळेतील शिक्षिका सविता पवार, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाला शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षक रेणू सुळकर, भारती शिराळे, सुनिता पाटील, वरदा देसाई, अश्विनी हलगेकर, प्रतिभा चवथे, नयन परमोजी, तेजश्री हंडे, वैभवी मोरे, दीप्ती कुलकर्णी, कमल हलगेकर, जयश्री पाटील, सविता गुरव, रोहिणी सावंत, वैभवी दळवी, श्रुती बेळगावकर, पद्मजा कुऱ्याळकर व विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta