बेळगाव : बेळगावच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड इंग्लिश मीडियम हायस्कूलने खानापूर (जि. बेळगाव) येथील साई स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित आंतरशालेय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे.
साई स्पोर्ट्स अकॅडमी खानापूरतर्फे नुकत्याच आयोजित आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा -2025 मध्ये जिल्ह्यातील 10 शालेय संघांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल संघाने संपूर्ण स्पर्धेत अपवादात्मक कौशल्य, सांघिक खेळ आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडवत विजेतेपद मिळविले. स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी भातकांडे स्कूल संघावर 8 -0 असा एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात कॅन्टोन्मेंट बोर्ड स्कूल संघाने प्रतिस्पर्धी अनुक्रमे मराठा मंडळ स्कूल खानापूर संघाला 4 -0 अशा गोल फरकाने आणि साई अकॅडमी स्कूल संघाला 9 -0 अशा गोल फरकाने पराभूत केले. आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवताना पुढील म्हणजे रूपांत फेरीच्या सामन्यात कॅन्टोन्मेंट बोर्ड स्कूल संघाने प्रतिस्पर्धी जैन हेरिटेज स्कूल संघावर 6 -0 असा एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात कॅन्टोन्मेंट बोर्ड स्कूल संघाची लढत स्थानिक सर्वोदय स्कूल संघाशी झाली. अंतिम सामन्यात प्रारंभापासून खेळावर वर्चस्व राखत कॅन्टोन्मेंट बोर्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी सर्वोदय स्कूल संघाला 4 -0 अशा गोल फरकाने पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद हस्तगत केले.
खानापूर येथील उपरोक्त आंतरशालेय स्पर्धा जिंकल्याबद्दल बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीव कुमार, कॅन्टोन्मेंट इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक के. जी. अमरावती, शारीरिक शिक्षक राकेश वाळवडे, फुटबॉल प्रशिक्षक सौरभ बिर्जे, कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळा व हॉस्पिटलचे ब्रँड अँबेसिडर संतोष दरेकर आदींनी विजेत्या कॅन्टोन्मेंट स्कूल संघाचे खास अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta