बेळगाव : मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी न्यायालयील लढ्यासोबत कायद्याच्या चौकटीत राहून रस्त्यावरील लढाई लढणाऱ्या समिती नेत्यांवर करवेच्या गुंडांची नेहमीच वक्रदृष्टी असते याचेच प्रत्यंतर आज पुन्हा बेळगावकरांना आले आहे.
सीमाभागात भाषिक तेढ निर्माण करून वातावरण गढूळ करणारे युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करून बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याची हास्यास्पद मागणी करवेच्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी आज बेळगाव पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे केली आहे.
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी करवे जिल्हा अध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा पोलिस आयुक्तांना निवेदन दिले असून बेळगावसह सीमाभागात भाषिक तेढ निर्माण करत प्रक्षोभक विधान करणारे शुभम शेळके हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी बेळगावातील मराठी भाषिकांना भडकावून शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप केला आहे. शुभम शेळके यांच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कर्नाटकातून हद्दपार करण्याची मागणी आज एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आली.

Belgaum Varta Belgaum Varta