बेळगाव : बेनकनहळ्ळी येथे शेतात जात असताना तोल जाऊन विहिरीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बेनकनहळ्ळी येथील रेणुका आप्पाजी देसुरकर (वय 45) रा. तानाजी गल्ली बेनकनहळ्ळी ही महिला व तिचा मुलगा दोघेही शेतात जात असताना सदर महिला तोल जाऊन विहिरीत पडली. मुलगा काही अंतर पुढे गेला व त्याने मागे वळून पाहिले असता त्याला त्याची आई कोठेच दिसली नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर महिलेचा शोध घेतल्यानंतर गावकऱ्यांनी एचईआरएफ रेस्क्यू टीमला सदर घटनेची तात्काळ माहिती दिली. माहिती मिळताच एचईआरएफ रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली व जवळपास 80 फूट खोल विहिरीत अत्याधुनिक अंडरवॉटर कॅमेऱ्याच्या साह्याने तपासणी करण्यात आली. कॅमेराद्वारे तपासणी करत असताना विहिरीत मृतदेह आढळून आला त्यानंतर एचईआरएफ टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, राजू टक्केकर यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीमने पाण्यात उतरून मृतदेह सुरक्षितरित्या बाहेर काढला. यावेळी स्थानिक नागरिक व ग्रामीण पोलीस अधिकारी यांचा मोलाचा सहभाग होता. अत्याधुनिक उपकरणे तत्पर कृती आणि स्थानिक समन्वयांच्या मदतीने ही शोध मोहीम तात्काळ व यशस्वीरित्या पार पडली.

Belgaum Varta Belgaum Varta