बेळगाव : अलीकडे सर्वत्र अंधश्रद्धा फोफावत चालली आहे. पूर्वीपासूनच रस्त्यावर ठराविक दिवशी उतारे पडलेले पाहाव्यास मिळतात. त्यात नारळ, लिंबू, पाणी, सुपारी, केळी, विविध फळ, हळदीकुंकू, गुलाल, दहिभात, बाहुली, कापड, सुई, खिळे, काळा दोरा, कोंबडा, कोंबडीची लहान पिल्ले त्याचबरोबर कोहळा तर कधी कधी बकऱ्यांचा सुद्धा बळी दिला जातो. हल्ली तर समाज माध्यमातून देखील विविध प्रकारचे तोटके सांगून अंधश्रद्धा पसरविण्याचा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. अमुक पदार्थ जाळा, तमुक लिहा, इच्छापूर्ती होईल असे सांगणारे रील्स देखील पाहायला मिळत आहेत. परंतु येळ्ळूर शिवारात रस्त्यालगत असलेल्या शेतात करणीबाधेचा एक वेगळाच प्रकार पहावयास मिळाला आहे. येळ्ळूर शिवार येथील शेतवाडीत उताऱ्याबरोबर अक्षरशः मोबाईल देखील ठेवून गेल्याचा प्रकार घडला आहे. करणीबाधेचा हा प्रकार पाहता अंधश्रद्धा देखील हायटेक झाली आहे की काय असे वाटत आहे. सदर शेतात यापूर्वी देखील चार-पाच वेळा विविध प्रकारचे उतारे टाकण्यात आले होते. वारंवार चाललेल्या या करणीबाधेच्या प्रकारामुळे सदर शेतकरी कुटुंब भीतीच्या छायेखाली वावरत आहे. उताऱ्यांचे प्रकार सांगणाऱ्या भोंदूबुवाच्या मानसिक ते सोबतच उतारा करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेची देखील कल्पना करणे हे सर्वसामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडे झालेले आहे. एखाद्याच्या शेतात अशा प्रकारची करणीबाधा करण्याऐवजी एखाद्या निर्जनस्थळी जाऊन अंधश्रद्धा जोपासावी असे देखील काहींचे मत होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta