बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेच्या मूलभूत अधिकारांवर कर्नाटक सरकारकडून गदा आणली जात आहे. मराठी भाषेला हद्दपार करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याची गरज आहे. या विरोधात येत्या ११ तारखेला काढण्यात येणाऱ्या कन्नड सक्तीविरोधी मोर्चात हजारो मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ता. म. ए. समितीचे अध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मराठा मंदिरात पार पडली. यावेळी बोलताना मनोहर किणेकर म्हणाले, “घटनेने दिलेल्या अधिकारांवर घाला घालण्याचे काम सुरू झाले आहे. आज आपण शांत बसलो तर सीमाभागातून मराठी भाषा संपुष्टात येईल. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात मोर्चाची जोरदार जनजागृती करावी. कर्नाटक सरकारला धडकी भरेल अशा पद्धतीने मोर्चामध्ये सहभागी व्हा,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले म्हणाले, “सीमाभागात कन्नड संघटनांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. घटनेची राजरोसपणे पायमल्ली होत आहे. मराठी जनता शांत बसल्यामुळे सरकार अधिक आक्रमक झाले आहे. कन्नड सक्तीच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चात मराठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या आईवर घाव घातला जात असताना मराठी जनतेने शांत राहू नये,” असे ते म्हणाले.
या बैठकीत माजी जि. प. सदस्य रामचंद्र मोदगेकर, बी. डी. मोहनगेकर, विलास घाडी, मनोहर हुंदरे, अनिल पाटील, नारायण सावगावकर, पीयूष हावळ, मनोहर संताजी आदींनी आपली मते मांडली. बैठकीला आर. आय. पाटील, माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, मोनाप्पा पाटील, लक्ष्मण पाटील, डी. बी. पाटील, एम. बी. गुरव, निंगाप्पा मोरे, किरण मोटणकर, सतीश पाटील, विठ्ठल पाटील, एल. आर. मासेकर, सागर सावगावकर यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta