
कोल्हापूर : महाराष्ट्र नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी आहे. कन्नडसक्ती विरोधातही मराठी जनतेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. तसेच वेळ पडल्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेटून आणि कन्नडसक्ती संदर्भात चर्चा करू असे वक्तव्य महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी बेळगाव येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर कन्नड सक्ती विरोधात महामोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मंत्री उदय सामंत पत्रकारांशी बोलत होते.
कन्नडसक्तीबाबत बोलताना पुढे ते म्हणाले की, कर्नाटक प्रशासन सीमावासीयांवर अन्याय करत आहे. सध्या सुरू असलेल्या कन्नडसक्ती संदर्भात शिवसेनेच्या कोल्हापूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आपण स्वतः बेळगावला जाऊ आणि तेथील मराठी भाषिकांची भेट घेऊ असे यावेळी ते म्हणाले. यापूर्वी देखील बेळगावला येण्यासंदर्भात उदय सामंत यांनी सीमावासीयांना आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही. यावेळी तरी महाराष्ट्रातील मंत्री सीमावासीयांच्या भावना जाणून घेण्यासाठी व कर्नाटक सरकारला जाब विचारण्यासाठी बेळगावात पोहोचतील का असा प्रश्न बेळगावातील मराठी भाषिकांना पडला आहे?

Belgaum Varta Belgaum Varta