
बेळगाव : तारांगण सरस्वती इन्फोटेक आणि पोमन्ना बेनके यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता कॅन्टोन्मेंट मराठी शाळा, खानापूर रोड, बेळगावच्या सभागृहामध्ये पहिले बालकवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बेळगाव सीमाभाग हा साहित्याची पंढरी म्हणून ओळखला जातो. दरवर्षी 16 ते 17 साहित्य संमेलने या सीमाभागात आयोजित केली जातात. सीमा भागातील नव्या पिढीने साहित्याकडे वळावे आणि साहित्याची चळवळ व्यापक व्हावी, या उद्देशाने या संमेलनांचे आयोजन केले जाते. सीमा भागातील बालकवींना व्यासपीठ आणि एक प्रेरणा संमेलन निमित्त मिळत आहे. सरस्वती इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन आणि पोमन्ना बेनके या संमेलनाचे प्रायोजक आहेत. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष दैनिक पुढारीचे उपसंपादक, कवी श्री. शिवाजी शिंदे हे आहेत. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील, पुणे येथील उद्योजक श्री रविंद्र बिरजे, श्री.विनोद बामणे, ज्योती बामणे, पोमण्णा बेनके, डॉ. दत्तप्रसाद गिजरे, डॉ. गोविंद मिसाळे, ॲड.सुधीर चव्हाण, श्री.प्रशांत बिर्जे आहेत. जवळजवळ 40 पेक्षा जास्त विद्यार्थी याच्यामध्ये कविता सादर करणार आहेत. या संमेलनास साहित्यप्रेमींनी उपस्थिती दर्शवावी असे आयोजकांच्याकडून कळविण्यात आले आहे .
यावेळी स्केटर देवेन बामणे कराटेपटू ईश्वरी मंडोळकर यांचा सन्मान केला जाणार आहे.
श्री शिवाजी शिंदे यांचा परिचय
श्री शिवाजी शिंदे हे पत्रकार लेखक आणि कवी अशी बेळगाव सीमा भागात त्यांची ओळख आहे. मागील 20 वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. 25 वर्षापासून कविता लेखन करत आहेत. 2013 पासून दैनिक पुढारीमध्ये उपसंपादक म्हणून काम करत आहेत. 2012 हिरवे गाणे हा कवितासंग्रह प्रकाशित केला या कवितासंग्रहाला कोल्हापूरच्या न . ना. देशपांडे पुरस्कार व बेळगावच्या वाङ्मय चर्चा मंडळ यांच्याकडून पुरस्कार मिळालेला आहे.
2014 साली कवी अविनाश ओगले स्मृती पुरस्कार मिळाला आहे.
निलजी येथील बालसाहित्य संमेलनात त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
2020 या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या मराठी साहित्य संमेलनात कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद भूषवले आहे.
सन 2022 मध्ये त्यांनी राणी चन्नमा विद्यापीठाच्या मराठी विभाग आयोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. सन 2025 च्या येळ्ळूर साहित्य संमेलनात “पत्रकार पुरस्कार” देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विविध दिवाळी अंकातून त्यांच्या कविता आणि कथा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ग्रामीण जीवनाशी निगडित असे त्यांचे साहित्य आहे.

Belgaum Varta Belgaum Varta