येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये मंगळवार (ता. 12) रोजी ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी एस. आर. मराठे होते. तर पाहुणे म्हणून प्रा. सी एम गोरल, निवृत शिक्षक एस एम मासेकर, व एस एम कोकणे उपस्थित होते. प्रारंभी ग्रंथपाल कलमेश कोकणे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून ग्रंथपाल दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर एस आर मराठे यांनी डॉ एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी बोलताना प्रा. सी एम गोरल म्हणाले, ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे, ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहितीचे संग्रह करणे हा असतो. ग्रंथ म्हणजे ज्ञानसाठा आणि ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचा सागर होय. राष्ट्राचे उत्तम नागरिक घडविण्याचे व त्यांना संस्कारित करण्याचे कार्य ग्रंथालये करीत असतात. पुस्तके ही ज्ञान, शिक्षण व संस्कृतीचे प्रसारण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पुस्तके ही ज्ञानाची भंडारे आहेत. पुस्तके शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत असतात. कोणत्याही ग्रंथालयाचे यश हे ग्रंथपालावर अवलंबून असते. यासाठी ग्रंथपालाचे व्यवस्थापन उत्तम असणे गरजेचे असते.
यावेळी बोलताना सेक्रेटरी एस आर मराठे म्हणाले, विद्यार्थ्यांनी दररोज पुस्तकी ज्ञानाबरोबर अवांतर वाचन सुद्धा केले पाहिजेत. थोर पुरुषांची साहित्यिकांची चरित्रे विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत. तरच त्यांचे ज्ञान भंडार वाढणार आहे. यावेळी एस एम मासेकर, विद्यार्थी कु. दिशा चलवादी, कु. सुजाता भंगी, कु. दर्शन भंगी यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाला निर्मला बारस्कळे, सुशीला मेलगे, महादेव मुरकुटे, विनोद हट्टीकर, संतोष हुवान्नावर, पुंडलिक तळवार, राजू भोसले, शंकर शिंगे, सिद्धू बागेवाडी, शांता हुवान्नावर, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पुंडलिक तळवार यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta