बेळगाव : मुतगा (ता. बेळगाव) येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात मुतगा गावातील श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख, शेतकरी नेते सचिन पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांचे आमरण उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते.
आपल्या आंदोलनाबाबत बेळगाव वार्ता बोलताना सचिनदादा पाटील यांनी सांगितले की, मुतगे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही गेल्या चार-पाच वर्षापासून आंदोलन करत आहोत. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आता चौथ्यांदा आमच्यावर या पद्धतीने उपोषण करण्याची वेळ आली आहे.
सदर सहकारी संघाचे चेअरमन सेक्रेटरी आणि संचालक मंडळाने अशी परिस्थिती आणून ठेवली आहे की या संस्थेसाठी उपोषण करण्याची लाजिरवाणी वेळ आमच्यावर आली आहे. सदर संस्थेत मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार आम्ही सहकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांवरून सिद्ध करू शकतो. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा आदेशही आरसीएस कार्यालयाकडून आला आहे. मात्र इतके होऊनही या संस्थेचे संचालक लोकांना जितका त्रास देता येईल तितका देत आहेत. शेतकऱ्यांची कर्ज थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्याकडून संस्था उत्तमरीत्या चालली असल्याचा फक्त देखावा केला जात आहे. सदर मंडळी लोकांकडे दुर्लक्ष करून या कृषी पतसंस्थेचा वापर फक्त जिल्ह्याच्या राजकारणासाठी करून घेत आहेत असा आरोप करून चेअरमन, सेक्रेटरी व संचालक मंडळाने शेतकऱ्यांना हवे असलेले कर्ज कसे उपलब्ध करून देता येईल याकडे लक्ष द्यावे अन्यथा येत्या काळात त्यांना गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला.
अधिकाऱ्यांनी जी भ्रष्टाचाराचा पुरावा असलेली कागदपत्रे दिली आहेत त्यांच्या आधारे दोषींवर दिवाणी आणि फौजदारी कारवाई झाली पाहिजे असे सांगून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण थांबणार नाही, असा इशारा संबंधित अधिकारी आणि खात्याला देताना शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वितरित केले जावे आणि भ्रष्टाचारात सामील संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे, असे सचिन पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.
गावातील विविध असोसिएशन, गणेशोत्सव मंडळ, युवक मंडळ यांच्याकडून त्यांना पाठींबा दर्शवण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta