बेळगाव : कलखांब येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
माजी एसडीएमसी अध्यक्ष भरमा पाटील यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात, हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष कल्लाप्पा पाटील होते. यावेळी गणेश सोसायटीचे चेअरमन मनोहर हुक्केरीकर, शिवाजी पाटील, रमेश पाटील, दिनेश परमोजी, बलराम परमोजी, संजय शिपूरकर, एसडीएमसी सदस्य, शाळेचे शिक्षकवर्ग आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ. अनिता भोंगाळे यांनी उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची प्रेरणा वाढते आणि आर्थिक अडचणींवर मात करून ते यशस्वी होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
शिक्षिका कुंडेकर यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta