
बेळगाव : आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये श्रावणानिमित्त भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रेणुका भजनी मंडळ,भाग्यनगरच्या भगिनींनी सुरेख आवाजात, टाळ मृदंगाच्या आणि हार्मोनियमच्या साथीने अनेक भजने सादर केली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात हार्मोनियम वादक शंकर पाटील आणि तबला वादक प्रमोद पाटील यांचा मदन बामणे यांच्याहस्ते शाल भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तर भजनी मंडळाच्या सदस्यांना डॉ. सविता देगीनाळ, रेखा बामणे आणि डॉ. सुरेखा पोटे यांच्याहस्ते हळदीकुंकू आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रावण महिन्यात भजन किर्तन करणे खूप शुभ मानले जाते. अनेक लोक या महिन्यात मंदिरांमध्ये किंवा घरी भजन-कीर्तन करतात. अध्यात्मिक शांतीसाठी हे एक उत्तम माध्यम आहे.
संजीवनी काळजी केंद्रातील रुग्णांच्या मनाला शांती मिळावी आणि त्यांच्यातील नकारात्मक विचार दूर व्हावे या हेतूने श्रावण महिन्यात भजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे संस्थेचे अध्यक्ष मदन बामणे यांनी सांगितले.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ पासून सुरू करून सर्ववमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, जय जय राम कृष्ण हरी, सुंदर ते ध्यान उभे विटे वरी, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशा अनेक भजनांचा त्यात समावेश होता. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या भजन संकीर्तन कार्यक्रमाची आरती आणि पसायदानाने सांगता झाली.

Belgaum Varta Belgaum Varta