Wednesday , December 10 2025
Breaking News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर सुवर्ण महोत्सवी वर्ष

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एक भव्य परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगाव सीमाभागात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्सासात आणि उत्साहात साजरा केला जातो. बेळगावच्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेण्याचे काम एका विशिष्ट पूर्ण रीतीने बेळगाव उपनगरातील बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे. यावर्षी बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. त्याचबरोबर याच भागातील सुप्रसिद्ध संगीता स्वीट्स 51 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना कै. शिवणसा भांडगे, कै. गुणाजीराव पाटील व कै. सुरेश मेलगे यांनी केली होती. मंडळाने आतापर्यंत आपला सार्वजनिक गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरावा यासाठी आजवर विविध प्रकारचे देखावे आणि उपक्रम पार पाडले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मंडळाने सादर केलेला गोकाकचा धबधबा, वृंदावन गार्डन, रस्ता डांबरीकरण, संगीत कारंजा, गुहा यांसारखे देखावे बेळगावकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. मंडळाने आतापर्यंत सादर केलेल्या गणेशोत्सवातील देखाव्यांची गणेश भक्तांत नेहमीच चर्चा होत आली आहे.

यावर्षी बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम यावर्षी हाती घेतले आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळाने यावर्षी सादर केलेला काशी विश्वनाथाचा भव्य देखावा गणेश भक्तांसाठी निश्चितच आकर्षण ठरणार आहे.”नमामी गंगे” या देखाव्यातून वाढत्या जलप्रदूषणावर सामाजिक संदेशही देण्यात आलेला आहे. मंडळाची सुबक श्रीमूर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार एम. जी. पाटील यांनी तर काशी विश्वनाथ देखावा युवा कलाकार साहिल कोकितकर यांनी साकारला आहे.

15 ऑगस्ट रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षातील श्री मूर्तीच्या आगमनाचा सोहळा मोठ्या धुमधडाक्यात आणि मंगलमय वातावरण पार पडला आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आज रविवारी रक्तदान शिबिर संपन्न झाले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 27 ऑगस्ट रोजी श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना पूजा आरती प्रसाद वाटप होणार आहे. त्यानंतर सलग आठ दिवस विविध प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम होणार आहेत. या अंतर्गत पोलीस, हेस्कोम, पत्रकार, शिक्षक, लोकप्रतिनिधी तसेच विविध जाती-धर्मातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर भजनी मंडळ वडगाव, श्री भक्ती महिला भजनी मंडळ भारत नगर, यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. क्रांती महिला मंडळ खासबाग यांच्यावतीने अथर्वशीर्ष पठण आणि मंगळागौर कार्यक्रम होणार आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने व्यसनमुक्तीवर आधारित जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गरजू वृद्धांना ब्लॅंकेट वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी सायंकाळी आरती नंतर एक वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळ्या पद्धतीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे, मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी यावर्षीच्या गणेशोत्सवाची कार्यधुरा सांभाळताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्सवाच्या खर्चाची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. ज्या परिसरात आपल्या व्यवसायाची भरभराट झाली त्या परिसरातील गणेशोत्सवाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी जगन्नाथ पाटील यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. जगन्नाथ पाटील यांचे संगीता स्वीट्स यावर्षी 51 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यावर्षीची श्रीमूर्ती तसेच देखावा व अन्य खर्चाची महत्त्वाची जबाबदारी जगन्नाथ पाटील यांनी स्वीकारले आहे. यावर्षी जमा होणाऱ्या लोकवर्गणीतून पुढील काळात विधायक स्वरूपाचे काम हाती घेण्यात येणार आहे. आपणही काही समाजाचे देणे लागतो याच भावनेतून जगन्नाथ पाटील यांनी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाला भव्य दिव्य बनवण्याचे ध्येय बाळगून मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समवेत गणेशोत्सवाची जय्यत तयारी केली आहे.

पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष सचिन रंगरेज, सदानंद कदम, हिरालाल चव्हाण, सचिन पवार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *