
बेळगाव : अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी जिल्हा प्रशासनाकडून अल्पोपहाराचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महानगरपालिकेला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत सत्ताधारी नगरसेवकांनी महानगरपालिकेत गोंधळ घालून जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शविला. या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने तात्काळ जत्तीमठात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर महामंडळाने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन गणेश विसर्जनाच्या दिवशी ठरल्याप्रमाणे महाप्रसादाचे वाटप करण्याची व्यवस्था ठेवण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली आहे. परंतु या महाप्रसादाचा आर्थिक भार लोकवर्गणीतून तथा बेळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून उचलला जाईल. या आयोजनाचा सरकारी तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नाही असे स्पष्ट करत सत्ताधारी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असे देखील यावेळी स्पष्ट केले.

मागील दोन महिन्यापासून जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी करीत आहे. बेळगावचा गणेशोत्सव हा प्रसिद्ध असून बेळगाव परिसर त्याचप्रमाणे शेजारील महाराष्ट्र, गोवा, उत्तर कर्नाटक आदी भागातून भाविक गणेशोत्सवाचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी बेळगावात येतात. बाहेरून येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाने गणेश विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांची सोयच होणार आहे असे देखील यावेळी महामंडळाने म्हटलं. गणेशोत्सव महामंडळाने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी चौक त्याचप्रमाणे बॅरिस्टर नाथ पै सर्कल शहापूर या दोन ठिकाणी अन्नदान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लागणारा निधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केला जाईल. महाप्रसादाच्या आयोजनावरून सत्ताधारी नगरसेवकांनी घातलेला गदारोळ असल्यामुळे गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्या या कृत्यामुळे भाजप नगरसेवकांचे बेगडी हिंदुत्व या ठिकाणी अधोरेखित होत आहे. गणेशोत्सव जल्लोषात यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या सर्व निर्णयांना सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ संपूर्ण सहकार्य करेल असे देखील यावेळी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले. यावेळी रमाकांत कोंडुस्कर, विकास कलगटगी, दत्ता जाधव, महादेव पाटील, आनंद आपटेकर, बळवंत शिंदोळकर, सागर पाटील, निलेश शिंदे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta