

बेळगाव : काही दिवसांपासून आपल्या गणरायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गणेश भक्तांची प्रतीक्षा अखेर आज संपली. आज पहाटेपासूनच बेळगाव शहर तसेच उपनगरात घरोघरी गणरायाचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाचे स्वागत करण्यात आले. मागील महिनाभरापासून घरोघरी त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न होते. विविध देखावे, सजावटी करण्यासाठी थोरामोठ्यांपासून बालचमूचा देखील सहभाग होता. भाद्रपद चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करून भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सजावटीच्या विविध साहित्याने बाजारपेठ फुलून गेली होती. विविध प्रकारचे आकर्षक पडदे, कागदी फुलांच्या माळा, मोत्यांचे तोरण आदींनी बाजारपेठ सजून गेली होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे त्याचप्रमाणे घरगुती देखावे करण्यात गणेश भक्त मग्न झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आठवडाभरापासून आगमन सोहळा अगदी जल्लोष साजरा केला व आज चतुर्थीच्या मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तर घरगुती गणपतीचे पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आज सकाळपासूनच गणरायाला घरी आणण्याची लगबग घराघरात पूर्णत्वास येत होती तर महिलावर्ग गणरायाच्या आवडीचे मोदक, पुरणपोळी आणि पारंपारिक नैवेद्य करण्यात मग्न असल्याचे दिसून येत होते. आज सकाळपासूनच सनई चौघड्यांच्या तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत गणरायांचे आगमन झाले. आज बुधवारी सकाळपासूनच चतुर्थीचा मुहूर्त असल्यामुळे आज सकाळपासून वाजत गाजत गणपती बाप्पाला घरी आणण्यात आले. घरगुती गणपतीची पूजा आरती आठवून तरुण वर्ग व बालगोपाळ सार्वजनिक गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाहेर पडले. सार्वजनिक श्रीमूर्ती आणून विधिवत पूजा करण्यात आली.


Belgaum Varta Belgaum Varta