बेळगाव : बेळगावातील खाजगी ‘जय किसान भाजी मार्केट’ बंद केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. ‘बुडा’ च्या धोरणांचा निषेध करत आज जय किसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या व्यापाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मोहम्मद मन्नोळकर यांनी सांगितले की, ‘जय किसान भाजी मार्केट सुरू झाल्यापासून एपीएमसी बंद झालेले नाही आणि कोणीही ते बंद करण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र, काही लोक खासगी भाजी मार्केटविरोधात लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. महापालिकेला २ कोटी ४३ हजार रुपये शुल्क भरण्यात आले आहे. तसेच, ‘बुडा’ कार्यालयालाही ३५ लाख रुपये शुल्क भरले आहे. येथे कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. काही लोक जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करत आहेत. जर हे थांबले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.’
एका व्यापाऱ्याने आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, ‘२०१४ पासून अनेक लोकांनी या खाजगी भाजी मार्केटविरोधात न्यायालयात धाव घेतली, परंतु न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळून लावत त्यांना फटकारले आहे. गेल्या ४ वर्षांपासून हे मार्केट सुरू आहे. तरीही आता पुन्हा अडथळे निर्माण केले जात आहेत. सुपारी घेऊन काही लोक जय किसान मार्केटविरोधात लोकांची दिशाभूल करत आहेत. हे थांबले नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू.’
व्यापारी करीमसाब बागवान यांनी आरोप केला की, ‘बुडा’ आयुक्तांनी जय किसान भाजी मार्केटची परवानगी रद्द करण्याचा निर्णय चुकीचा आहे. याच चिंतेने गेल्या काही दिवसांपूर्वी व्यापारी इस्माईल मुजावर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याला ‘बुडा’ आयुक्त आणि खोटे आरोप करणारेच जबाबदार आहेत.’
महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मुजाम्मिल धोणी म्हणाले की, ‘बुडा’ आयुक्त उच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का? त्यांच्या या निर्णयामुळे एका व्यापाऱ्याचा बळी गेला आहे. एपीएमसी बंद करण्याचा कोणाचाही उद्देश नाही. ‘बुडा’ आयुक्तांप्रमाणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने घाईघाईत निर्णय घेऊ नये.’
Belgaum Varta Belgaum Varta