बेळगाव : रिमझिम पावसांच्या सरितही यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवा दरम्यान महाप्रसाद कार्यक्रमांनाही उधाण आले आहे. दरम्यान बॅ. नाथ पै चौक गणेशोत्सव मंडळांने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाप्रसादा ऐवजी प्रत्येक दिवशी एक वेगळ्या प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखा असा स्वादिष्ट प्रसाद वाटपाचा उपक्रम गणेश भक्तांमध्ये कौतुक आणि चर्चेचा विषय बनला आहे.
देशातील अनेक प्रसिद्ध देवस्थानातून नित्यनेमाने आणि गेल्या कित्येक वर्षांपासून भोजन स्वरूपात महाप्रसाद दिला जातो.देवस्थानला दूर दूर वरून येणाऱ्या भाविकांना एक वेळच्या भोजनाची व्यवस्था व्हावी याच हेतूने सर्व देवस्थानातून महाप्रसाद होत असतो. गेल्या दहा पंधरा वर्षात बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात एखादा उत्सव, सण, जयंती आणि विविध धार्मिक सोहळ्यांच्या वेळी महाप्रसादाचे हमखास आयोजन केल्याचे पाहायला मिळते. गणेशोत्सवातही असंख्य मंडळे महाप्रसादाचे आयोजन करतात. हजारो नागरिक महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसादासाठी आयोजकांवर मोठा आर्थिक भारही असतो. महाप्रसाद कार्यक्रम करताना आयोजकांना जास्तीत जास्त देणगीदारांवर अवलंबून राहावे लागते.
त्यातही प्रामुख्याने महाप्रसादाचे अन्न बनविताना मोठी काळजी घ्यावी लागते. महाप्रसाद कार्यक्रमा दरम्यान विषबाधा होऊन नागरिकांच्या आरोग्याला धक्का पोहोचल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे महाप्रसाद कार्यक्रमावेळी आयोजकांना पिण्याच्या पाण्यापासून ते अन्नधान्य भाजीपाला या प्रकारच्या महाप्रसादाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची पुरेपूर काळजी घ्यावी लागते.
यंदाच्या गणेशोत्सवातही महाप्रसाद कार्यक्रमांना शहर आणि ग्रामीण भागात उधाण आले आहे. दरम्यान शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील गणेशोत्सव मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त मंडळाने विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र मंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध संगीता स्वीटचे संचालक जगन्नाथ पाटील यांच्या संकल्पनेतून सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळाने महाप्रसाद कार्यक्रमाला फाटा देत, गणेशोत्सवाच्या प्रत्येक दिवशी एक आगळ्यावेगळ्या प्रकारचा स्वादिष्ट प्रसाद वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
दरम्यान, काल बुधवारी (दि. ३) रोजी माजी नगरसेवक श्री. बाळासाहेब अर्जुनराव धामणेकर, श्री. विजय अर्जुनराव धामणेकर (गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर) व बंधू यांच्यावतीने प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
मंडळाने आत्तापर्यंत साखर भात, साबुदाणा खिचडी, हलवा, शिरा, गव्हाची खीर, रव्याची खीर, राजगिऱ्याचे लाडू, बुंदीचे लाडू, सुदामा पोहे, बुंदी, शाबू चिवडा, पुलावा, कुंदा मोदक, फळे आदी प्रसाद स्वरूपात वाटप केले आहे. प्रत्येक दिवशी किमान 3 हजार गणेश भक्तांना एक आगळ्यावेगळ्या प्रकारचा प्रसाद देण्याचा उपक्रम मंडळाने सुरू केलेला आहे. प्रत्येक दिवशी शिस्तबद्धरीत्या प्रसाद वाटप करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या मंडळाचा प्रसाद बेळगावातील गणेश भक्तांसाठी एक औत्सुक्याचा, कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta