Thursday , March 5 2026
Breaking News

शांततेत गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडा; सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : मागील दहा दिवसापासून बेळगावसह परिसरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रानंतर बेळगाव येथे गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. उद्या शनिवारी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणेश विसर्जन होणार आहे. बेळगाव येथील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावसह गोवा, महाराष्ट्र येथील लोक देखील आवर्जून बेळगावात येत असतात. अलीकडे विसर्जन मिरवणूक सोहळा जवळजवळ 48 तासाहून अधिक काळ चालतो. त्यामुळे प्रशासनाने गणेश मंडळाना या सगळ्याचा विचार करून काही नियमावली घालून दिली आहे. त्याचप्रमाणे मिरवणुकीत होणाऱ्या डॉल्बीच्या आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण व विविध धोके टाळण्यासाठी डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा आणली आहे. कारण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपती विसर्जन करीत असताना मोठमोठ्याने डॉल्बीचा दनदनाट आणि कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची त्यांना जाणीव राहत नाही. याचा परिणाम म्हणून जेष्ठ नागरिक किंवा लहान मुलांच्या तब्येतीवर याचा परिणाम होतो. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात काही नियम व अटी घालून दिलेले आहेत त्या नियम व अटीनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे गणेश विसर्जन अत्यंत शांततेत व भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात यावे. एखाद्या राजकीय व्यक्तीच्या प्रक्षोभक वक्तव्याला बळी पडून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन गणेश महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.

बेळगाव येथील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. ती परंपरा जपत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडा. बेळगावसह परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवावर मराठा समाजाचे प्राबल्य आहे. बहुतांश सर्वच गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारणीवर मराठा समाजाचे तरुण कार्यरत आहेत. सध्या बेळगाव शहरात एका राजकीय व्यक्तीच्या प्रक्षोभक वक्तव्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये सदर राजकीय व्यक्तीने उघड उघड प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्याचा जणू आदेशच या तरुणांना दिला आहे. पुढे जाऊन गणेशोत्सव मंडळांनी या नेत्याच्या प्रक्षोभक वक्तव्याला बळी पडत प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्यास शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल व त्याचा ठपका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर ठेवला जाईल. पर्यायाने या सर्वांमध्ये मराठा समाजाची मुले भरडली जातील. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल होतील. जेणेकरून या तरुण मुलांचे पुढील भविष्य धोक्यात येईल त्यामुळे मराठा समाजाच्या सर्व तरुण युवकांनी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून हा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा अत्यंत शांततेत पार पाडावा, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *