बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील येळ्ळूर गावातील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्याच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर गावात अशांतता निर्माण झाली होती, याप्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्यांपैकी खटला क्रमांक १२५ चा निकाल आज ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. या खटल्यातील सर्व ३२ संशयितांचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्यांच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे.
येळ्ळूर येथील वेशीवरील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना बेदम मारहाण केली होती आणि त्यांच्यावर सात गुन्हे दाखल केले होते. यापैकी तीन खटल्यांचा निकाल यापूर्वीच लागला असून, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
खटला क्रमांक १२५ मध्ये पोलिसांनी एकूण ४२ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. यापैकी सात जणांना वगळण्यात आले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ३२ जणांविरोधात हा खटला सुरू आहे. मागील सुनावणीत सर्व ३२ आरोपी न्यायालयात हजर होते आणि त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. संशयितांच्या बाजूने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचण्णावर आणि ॲड. शाम पाटील यांनी युक्तिवाद केला.
या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये अर्जुन नागप्पा गोरल, चांगदेव सातेरी देसाई, अनंत भरमाजी चिट्टी, वृषेशण चंद्रकांत पाटील, सामाजी बाबूराव हट्टीकर, शिवाजी शंकर कदम, सुनील निंगप्पा धामणेकर, परशराम मारुती कुंडेकर, महेश हनमंत कानशिडे, विशाल शिवाजी गोरल, अमर बळीराम पाटील, भैरू मनू कुंडेकर, किरण नारायण उडकेकर, मोहन मारुती कुगजी, भरमा मनोहर हलगेकर, रमेश जयराम घाडी, उदय विकास पाटील, विलास यल्लप्पा पाटील, सागर शिवाजी कुंडेकर, बाबू कचु कणबरकर, रोहित सुरेश धामणेकर, अनिल महादेव धामणेकर, चांगप्पा आनंद मिसाळे, मिथुन चांगप्पा शहापूरकर, सागर मारुती पाटील, किशन सांबरेकर, सूरज यल्लप्पा घाडी, विशाल अशोक टक्केकर, अमोल शिवाजी जाधव, राजू यल्लप्पा तोपिनकट्टी, अनिल शंकर कंग्राळकर, सागर यल्लप्पा काकडकर, संतोष रमेश मेलगे, बाबू बैरू मेलगे, मिंटू पिराजी बेकवाडकर, अरुण बोमानी गोरल, सुहास रामचंद्र पाटील, राहुल अर्जुन अष्टेकर, उमेश शंकर सांबरेकर, योगेश पिराजी मजूकर, अमित कृष्णा पाटील आणि प्रवीण परशराम बागेवाडी यांचा समावेश आहे.
आजच्या निकालाकडे सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta