बेळगाव : आज बेळगावमध्ये केडीपी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सरकारी शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षकांच्या समस्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शिक्षकांच्या प्रश्नांवर योग्य उत्तर न मिळाल्यामुळे कागवाडचे आमदार राजू कागे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या केडीपी बैठकीत बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी आपल्या मतदारसंघातील सरकारी शाळांच्या आधुनिकीकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना, संबंधित शिक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, मंडळाकडून केवळ माध्यमिक शाळांची माहिती मागवण्यात आली होती आणि ती पाठवण्यात आली आहे. ते म्हणाले की, ५७ शाळांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. आमदार आसिफ सेठ आणि आमदार गणेश हुक्केरी यांनी आमदारांना माहिती न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी शाळांची यादी तयार करून आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरच काम सुरू करावे, असे सूचित केले. याचवेळी, कागवाडचे आमदार राजू कागे यांनी सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या समस्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, केडीपी बैठकीत अशा छोट्या-छोट्या विषयांवर चर्चा करणे योग्य नाही. शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडून (डी.डी.पी.आय.) योग्य उत्तर न मिळाल्याने, त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याला (बी.ई.ओ.) वास्तवातील परिस्थिती सांगण्यास सांगितले.
यावेळी व्यासपीठावर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, एमएलसी प्रकाश हुक्केरी, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta