बेळगाव : कंग्राळी बुद्रुक (ता. बेळगाव) येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रेची पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे. 28 एप्रिल 2026 रोजी पारंपरिक वैभवात होणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने 16 सप्टेंबर 2025 रोजी पहिला कटबंध वार पाळण्यात आला.
सकाळी देवीची पूजाअर्चा आणि गदगेवरील पावलांचे पूजन करून धार्मिक विधी पार पडले. पहिल्या वारानिमित्त गावातील सर्व व्यवहार, शेतकाम, दुकाने, गिरण्या, लोहारकाम तसेच शाळा बंद ठेवण्यात आल्या. गावकऱ्यांनी ठरलेल्या परंपरेनुसार घरात भाकरी न करण्याचा संकल्प पाळला. विशेष म्हणजे या दिवशी गावातील कोणालाही बाहेर जाण्यास तसेच बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यास परंपरेनुसार मनाई करण्यात आली.
एकूण पाच वार पाळण्यात येणार असून त्यातील पहिला वार मंगळवार, 16 सप्टेंबरला झाला. उर्वरित वार खालीलप्रमाणे साजरे होणार आहेत:
दुसरा वार : शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025
तिसरा वार : मंगळवार, 23 सप्टेंबर 2025
चौथा वार : गुरुवार, 25 सप्टेंबर 2025
पाचवा वार : मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
यावेळी महालक्ष्मी यात्रा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि एकात्मतेचे प्रतीक असलेली ही परंपरा यात्रेच्या यशस्वी आयोजनाची पायाभरणी ठरत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta