
बेळगाव : जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी रद्द झाल्यानंतरही इमारत न पाडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी आज बेळगाव महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. जोपर्यंत ही इमारत तोडली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
जय किसान खासगी भाजी मार्केटची इमारत बांधण्याची परवानगी रद्द झाली आहे, तरीही महापालिकेने ती पाडण्याची नोटीस अद्याप बजावलेली नाही. यामुळेच शेतकरी संघटनांनी हे आंदोलन केले. ‘महापालिका कोणत्याही दबावाखाली न येता ही इमारत तात्काळ पाडावी,’ अशी मागणी शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांनी केली.
यावेळी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे नेते किशन नंदी यांनी महापालिका आयुक्तांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “महापालिका आयुक्तांनी आपले कर्तव्य विसरले आहेत. त्यांना कर्तव्य आठवण करून देण्यासाठी आज शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. आदेश असूनही ते कोणाच्या दबावामुळे कार्यवाही करत नाहीत, हे कळत नाहीये.” जोपर्यंत महापालिका आणि पोलीस आयुक्त या इमारतीवर बुलडोझर चालवून ती पाडत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta