

बेळगाव : मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यामुळे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. कर्नाटक राज्यात आजपासून जातनिहाय जनगणती सुरू झाली आहे. यावेळी मराठा समाजाने आपली जबाबदारी लक्षात घेऊन येणाऱ्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळविण्याच्या दृष्टीने जनगणती वेळी मराठा कुणबी अशी नोंद करा, असे आवाहन मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या मेळाव्यावेळी करण्यात आले. सकल मराठा समाजातर्फे जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होता. मराठा समाजाकडे मोठ्या प्रमाणात शेती होती व सर्व कुटुंब एकत्रित होती त्यामुळे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होता म्हणून मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता भासली नाही परंतु अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहे. त्याचप्रमाणे शेती कमी झाल्यामुळे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत चालला आहे. पूर्वी शिक्षण हे कमी खर्चात होत होते परंतु सध्यस्थितीत शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे मराठा समाजाला देखील आरक्षण मिळणे गरजेचे आहे यासाठी प्रत्येक मराठा बांधवांनी जनगणतीवेळी मराठा, कुणबी असा उल्लेख आवर्जून करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना ऍड. अमर येळ्ळूरकर म्हणाले की, विविध गॅझेट मधील नोंदीनुसार मराठा व कुणबी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्याला कुणबी म्हणत असत त्यामुळे मराठा समाजाने कोणतीही शंका मनात न बाळगता जनगणनेवेळी कुणबी असा उल्लेख करावा. बहुजन समाजाच्या विकासासाठी छत्रपती शाहू महाराजांनी 1905 पासूनच आरक्षण द्यायला सुरुवात केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 1992 पासून प्रयत्न सुरू आहे अलीकडच्या काळात मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे शैक्षणिक प्रगती आणि दरडोई उत्पन्न कमी झाले आहे घटनेतील पंधराव्या कलमानुसार जर एखादा समाज मागासलेला असेल तर त्या समाजाला आरक्षण देऊन पुढे नेण्याची तरतूद आहे. या कलमाचा विचार करत मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले पाहिजे त्यासाठी सध्या होऊ घातलेल्या जातनिहाय जनगणनेत मराठा समाजाने मराठा, कुणबी अशी नोंद करून समाजाला मिळालेल्या या संधीचा लाभ करून घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कर्नाटक सरकारकडून सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केला जाणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मराठा समाजाने कोणती भूमिका घ्यावी यासाठी बेंगलोर येथे मराठा समाजाचे नेते तसेच पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली व धर्म – हिंदू, जात -मराठा, पोट जात – कुणबी, मातृभाषा – मराठी अशी नोंद कर्नाटक राज्यातील प्रत्येक मराठा बांधवांनी करावी असा निर्णय घेण्यात आला यासाठी सर्वत्र जनजागृती करण्यात आली आहे. राज्याच्या सर्वच भागातील मराठा समाजाने याची दखल घेऊन मराठा कुणबी अशी नोंद करावी असे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे.
यावेळी माजी आमदार अंजलीताई निंबाळकर, माजी आमदार अनिल बेनके, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई, ऍड. एम. जी. पाटील, संजय सातेरी, अमित देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गुणवंत पाटील यांनी केले तर शिवराज पाटील, महादेव पाटील व सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी बेळगाव शहरासह विविध भागातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta