
बेळगाव : बेळगावमधील खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’चा परवाना रद्द करून ते तात्काळ बंद करण्याची मागणी करत आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी, जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी जय किसान भाजी मार्केट तात्काळ बंद करण्याची मागणी करत आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनकर्ते म्हणाले, ‘जोपर्यंत हे खासगी मार्केट बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. गरज पडल्यास, रस्ता रोको करून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.’ असे त्यांनी म्हटले.
यावेळी एका महिला आंदोलनकर्त्याने सांगितले की, ‘या खासगी भाजी मार्केटला बंद करण्याचा न्यायालयाचा आदेश असूनही त्याचे पालन होत नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या समस्येकडे लक्ष घालावे.’ असे त्यांनी म्हटले. जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कार्यालयातून बाहेर पडत असताना शेतकऱ्यांनी तिला घेराव घातला. गाडीतून खाली उतरून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी यावर सायंकाळी ५ वाजेपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांनी तात्काळ त्या मार्केटचा वीजपुरवठा खंडित करण्याची मागणी केली.

Belgaum Varta Belgaum Varta