
बेळगाव : बेळगाव तालुक्यात हिरेबागवाडी पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. याशिवाय, बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून दोन आरोपींना अटक केली आहे.
बेळगावमधील तारीहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामापूर गल्ली येथील रहिवासी सोमनाथ रमेश कल्लन्नवर (२४) याला गांजा सेवन केल्याच्या आरोपाखाली हिरेबागवाडी पोलिसांनी अटक केली आहे. दि. २३/०९/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेन्नवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालत असताना, तारीहाळ गावातील अडविसिद्धेश्वर मठासमोरील सार्वजनिक रस्त्यावर सोमनाथ संशयास्पद वर्तन करताना आढळून आला. त्याची चौकशी केली असता, त्याने अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून हिरेबागवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका खेळणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेळगावच्या मार्कंडेय नगर येथील रहिवासी बनप्पा बाळप्पा कोनकेरी (३१) आणि प्रकाश लगमप्पा तल्लुरी (२८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दि. २३/०९/२०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) लक्ष्मण जोडट्टी आणि त्यांच्या टीमने मच्छे गावातील अशोक आयर्न प्लांट-३ समोर छापा टाकला असता, आरोपी कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना मिळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून रू. २,७०० रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केले. आरोपींविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta