
बेळगाव : १ नोव्हेंबर हा सीमाभागमध्ये मराठी भाषिक काळा दिन म्हणून गेली ६९ वर्षे पाळत आहेत. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुभाषिक भाग राज्य पुनर्रचनेवेळी केंद्र सरकारने अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यामध्ये डांबण्यात आला आहे. तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिक केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हा दिवस काळा दिन म्हणून गांभीर्याने पाळत असतात. या दिवशी बेळगावमध्ये मराठी भाषिक काळे वस्त्र परिधान करून मूक सायकल फेरी काढतात.
सीमाभागातील मराठी भाषिकांना केंद्र सरकारने अद्याप न्याय न दिल्यामुळे, येणाऱ्या १ नोव्हेंबर २०२५ रोजी काळा दिन व कडकडीत हरताळ गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. यादिवशी बेळगाव येथून ही मूक सायकल फेरी निघणार असून व या दिवशी मराठी भाषिक सीमाभागातील आपले सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हारताळ पाळावा.
१ नोव्हेंबर २०२५ रोजी धर्मवीर संभाजी उद्यान येथून सकाळी ठीक ९.३० वाजता या मूक सायकल फेरीला सुरुवात होणार आहे. बेळगाव शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघून मराठा मंदिर येथे जाहीर सभा होणार आहे. तरी सीमाभागातील सर्व मराठी भाषिकांनी, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, युवा आघाडी व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी माजी लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, विठ्ठल पाटील, मोनाप्पा पाटील, आदींनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta