Friday , March 6 2026
Breaking News

धामणे गावातील अपुऱ्या व अनियमित बस सेवेमुळे त्रस्त ग्रामस्थांचे रास्तारोको

Spread the love

 

बेळगाव : धामणे गावामध्ये अपुऱ्या व अनियमित बस सेवेमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी धामणे येथे रास्ता रोको करून आंदोलन केले त्यामुळे काही काळ धामणे गावात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी वाहतूक पोलीस विभागाचे असिस्टंट ट्रॅफिक इन्स्पेक्टर एम. व्ही. बिल्लूर तसेच ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी धामणे ग्रामस्थांकडून वेळेत आणि जादा बसेस सोडाव्यात या संदर्भात निवेदन सादर केले. या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, धामणे गावात दिवसाकाठी फक्त दोन बसेस धावत आहेत त्यातच महिलांसाठी शक्ती योजनेद्वारे मोफत बस प्रवासाची घोषणा झाल्यापासून वेळेत बसेस मिळत नाहीत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. गर्दीमुळे शालेय विद्यार्थी दारा जवळ उभे राहून प्रवास करीत आहेत. असा जीवघेणा प्रवास करताना एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला विनंती केली आहे की, सीबीटी ते धामणे आणखीन ज्यादा दोन बसेस त्याचप्रमाणे धामणे ते देवनगट्टी येथे देखील आणखीन दोन बसेस असे एकूण चार बसेस धामणे गावासाठी उपलब्ध करून द्याव्यात. त्याचप्रमाणे धामणे गावात येणाऱ्या बसेस वेळापत्रकानुसार धावत नाहीत त्यामुळे शाळा, महाविद्यालय किंवा नोकरीसाठी जाणाऱ्यांना वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे धामणे गावातील एका बस कंडक्टर शिवानंद हुलकदली, टोकन क्रमांक 3705 हा प्रवाशांची असभ्यवर्तन करतो व बऱ्याचदा मद्यधुंद अवस्थेमध्ये सेवेवर असतो त्यामुळे त्याची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे. असिस्टंट ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टर एम. व्ही. बिल्लूर यांनी गावकऱ्यांना आश्वासन देताना सांगितले आहे की, धामणे गावासाठी अतिरिक्त दोन बसेस सोडण्यात येतील त्याचप्रमाणे गैरवर्तन करणाऱ्या “त्या” बस वाहकाची देखील तात्काळ बदली करण्यात येईल.
यावेळी ग्रामस्थ शालेय विद्यार्थी त्याचप्रमाणे धामणे ग्रामपंचायत अध्यक्ष पंडित पाटील, ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा रेमाणाचे, एम. आर. पाटील, शिवाजी पाटील, एम के पाटील, राजू बडिगेर, तसेच ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *