बेळगाव : कर्नाटक केसरी उमेश बिराजदार याने महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण याला पाचव्या मिनिटाला घिस्सा डावावर चितपट करत कंग्राळीचे कुस्ती मैदान मारले.
रविवारी बेळगावात तालुक्यातील कंग्राळी येथे कंग्राळी येथे झालेल्या कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीनं निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या क्रमांकाची कुस्ती कृष्णा पाटील, वस्ताद काशिनाथ पाटील, आर. आय. पाटील, आनंद पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली तर पंच म्हणून माजी आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू एम. आर. पाटील यांनी काम पाहिले.
गद्यासाठी दोन नंबरची कुस्ती रोहित पाटील (बेळगाव) व सोहेल शेख (कोल्हापूर) यांच्यामध्ये झाली. दोन्ही पैलवानांनी एकमेकांची ताकद लावली. पंधराव्या मिनिटाला रोहितने एकेरी पट काढत चाट मारून सोहेलला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नातून बाहेर पडला. त्यानंतर पंचांनी अतिरिक्त पाच मिनिटं वेळ देण्याचा निर्णय घेतला. तरीही कुस्ती निकाली लागली नाही तर शेवटी दोन नंबरची कुस्ती बरोबरीत सोडण्यात आली.
कंग्राळी येथे आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात कर्नाटक महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या. यावेळी अनेक कुस्ती पैलवान, पंच उपस्थित होते.