
बेळगाव : के. एल. ई. सोसायटीचे राजा लखमगौडा प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स, (आर.एल.एस), कॉलेज रोड, बेळगाव येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या “साइंटिया वेनारी – ६.०” या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनी आणि टॅलेंट हंटमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगावने नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
या आंतरशालेय स्पर्धेत बेळगावमधील एकूण ४४ शाळांनी सहभाग नोंदवला होता. ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाट्य स्पर्धेमध्ये (स्किट) भाग घेत, आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रथम स्थान पटकावले. ‘ड्रग्स शिवाय जीवन सुंदर आहे’ या सामाजिक आणि महत्त्वाच्या विषयावर शाळेच्या चमूने अत्यंत प्रभावी स्किट सादर केले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांना केवळ प्रभावितच केले नाही, तर त्यांना जनजागृतीचा संदेशही दिला आणि म्हणूनच या स्किटला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. शालेय एस.एम.सी. कमिटीचे चेअरमन आणि ज्योती कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रोफेसर आर. एस. पाटील, सेक्रेटरी नितीन घोरपडे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.
यावेळी, मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाविश्वातील पुढील वाटचालीसाठी आणि आगामी स्पर्धांमध्येही असेच उत्तुंग यश मिळवण्यासाठी अनेक शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta