
बेळगाव : कर्नाटक सरकारने येत्या 8 डिसेंबर रोजी बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक आज ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठा मंदिर येथे पार पडली. माजी आमदार मनोहर किणेकर हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
बैठकीत अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. बैठकीच्या सुरुवातीला मृत मान्यवरांना श्रद्धांजली वाहिली.
सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी मागील निर्णयांचे वाचन केले तर प्रकाश मरगाळे यांनी आतापर्यंत झालेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. सदस्यांनी समितीने एकसंघ राहूनच पुढील हालचाली करण्याचे मत व्यक्त केले.
अलीकडील इंग्रजी फलकांवरील दगडफेकीच्या घटनांवर पोलिसांनी हालचाल न केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलिस आयुक्तांकडे परवानगी व कर्नाटक रक्षण वेदिकेविरुद्ध निवेदन देण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
दरम्यान बोलताना मनोहर किणेकर म्हणाले की, मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व मराठी बांधवांनी एकजुटीने उभे रहावे. ऍड. एम. जी. पाटील यांनी हुतात्मा स्मारकासंबंधित बाबी स्पष्ट केल्या आणि उपस्थितांना समन्वय साधण्यासाठी आग्रह केला.
मराठी शाळांत कन्नड माध्यम सुरू करण्याच्या प्रयत्नांचा आर. एम. चौगुले यांनी तीव्र शब्दांत विरोध केला.
“महामेळावा हा कोणत्याही परिस्थितीत घ्यावाच,” असे ठाम मत नेताजी जाधव यांनी व्यक्त केले.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनोहर हुंदरे यांनी केली.
बैठकीवेळी रणजीत चव्हाण पाटील, आबासाहेब दळवी, रामचंद्र मोदगेकर, राजू मरवे, पियुष हावळ, मुरलीधर पाटील, बी. बी. देसाई, राजाराम देसाई, जयराम देसाई, मोनापा पाटील, बी. डी. मोहनगेकर, अनिल पाटील आदिंनी विचार मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta