
बेळगाव : आधुनिक युगात माणसाची जीवनशैली बदलली आहे. त्याचबरोबर विवाह पद्धतीतही अमुलाग्र बदल झालेले आहेत.आजच्या युगात शैक्षणिक स्तरावर मुलींनी भरीव प्रगती केली आहे.त्यामानाने मुलांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी दिसून येते. आणि यातूनच मराठा समाजामध्ये मुला मुलींचे विवाह जुळवताना पालकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. यासाठी वधू वर मेळावे काळाची गरज बनले आहेत. मराठा समाजातील तरुण तरुणींचे विवाह योग्य वयात संपन्न व्हावेत, याकडे लक्ष देऊन समाज हिताच्या ध्येयाने मराठा समाजातील विवाह इच्छुक तरुण-तरुणींसाठी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान वतीने 21 डिसेंबर रोजी रूपाली कन्वेंशन सेंटर जुना धारवाड रोड येथे,वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी दिली आहे.
वधू-वर मेळाव्याच्या आयोजनाच्या संदर्भात अधिक माहिती देताना डॉक्टर सरनोबत पुढे म्हणाल्या, श्रमजीवी आणि आर्थिक स्तरावर कमकुवत असलेल्या मराठा समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.एका बाजूला मुलींमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढले असताना दुसऱ्या बाजूला समाजातील तरुण वर्ग उच्चशिक्षित होताना दिसत नाही. मराठा समाजातील तरुण वर्ग पारंपारिक कामे, नोकरी, शेती यामध्येच रस घेत असताना दिसतो. याउलट मराठा समाजातील मुली शिक्षणाच्या जोरावर महानगरांमध्ये नामांकित कंपन्या, बँका,आयटी सेक्टर मध्ये काम करत आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत. यातूनच मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह जुळविताना पालकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते.
समाजातील अनेक मुलांचे विवाह जुळणे कठीण होऊन बसले आहे. त्याचबरोबर उच्चशिक्षित मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.यातून समाजातील मुला मुलींचे विवाह जुळविताना एक दरी निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.अशावेळी समाजाने संघटित रित्या नव्या युगातील महत्त्वाच्या आणि गंभीर विषयांवर मात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.मराठा समाजातील तरुण-तरुणींच्या विवाहाच्या समस्येकडे विशेष लक्ष देत वधू वर मेळावा काळाची गरज आणि जनहिताचे कार्य या दृष्टीने २१ डिसेंबर रोजी बेळगावात मराठा समाजातील वधू-वरांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
वधू – वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाज एकत्रित येऊन एकाच छताखाली अनेकांच्या गाठी – भेटीही होतील.अशा प्रकारच्या मेळाव्याची आजमितीस समाजाला नितांत आवश्यकता आहे.मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या सर्वच वधू वरांचे विवाह एकाचवेळी जुळून येत नसले तरी विखुरलेल्या समाजाला एकत्रित आणण्या बरोबरच तरुण पिढीत सुसंवाद घडविण्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे, ही बाब नाकारून चालणार नाही.
आज समाजात विवाह जुळले, व्यवस्थित पार पडले तरी घटस्फोटाचे प्रमाणही वाढल्याचे निदर्शनास येत आहेत.ही बाब कोणत्याही समाजासाठी चांगली नाही. त्याकरिता विवाहानंतर पती – पत्नीने परस्परांना समजून घेणेही तेवढेच महत्वाचे असते. एकमेकांना समजून घेतल्याशिवाय नात्यात प्रेम, आपुलकी निर्माण होऊ शकत नाही. एकमेकांसोबतचा संवादच सुखी संसारासाठी महत्वाचा असतो.वधू वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाज सेवेबरोबरच चांगल्या विचाराने सगळी मंडळी एकत्रित आल्यास समाजही संघटित होऊन प्रगती साधू शकतो.आजचे युग सोशल मिडियाचे आहे. या सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजातील मुलांवर सध्यस्थितीत चांगले संस्कार होणे आवश्यक झाले आहे. संस्काराशिवाय जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. जीवनामध्ये सुखी संसारालाही अनन्यसाधारण असे महत्व आहे. पालकांनी आपल्या मुला मुलींना सुखी संसाराची गणिते समजावून सांगावीत. कोणाचीही श्रीमंती ही पैसा – मालमत्तेवर न मोजली जाता ती मुलांवर केल्या जाणाऱ्या संस्कारावर मोजली जाणे आज गरजेचे बनले आहे.त्याकरिता आई वडिलांनी मुला – मुलींवर चांगले संस्कार करावेत. वधू-वर मेळाव्याच्या आयोजनातून तरुण-तरुणी तसेच पालकांमध्ये सुसंवाद घडविण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधू वर मेळाव्याचा मराठा समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहनही डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta