
बेळगाव : सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 8 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करून तो यशस्वी करण्याचा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.
मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे झालेल्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किनेकर हे होते.
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी सुवर्णसौध बेळगाव येथे होते त्याला विरोध म्हणून 2006 पासून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. समितीच्या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीदरम्यान बोलताना माजी आमदार मनोहर किनेकर म्हणाले की, कर्नाटक सरकार 2006 पासून डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन बेळगाव मध्ये घेत आहे. जेव्हापासून बेळगाव सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशन घेण्यात येते तेव्हापासूनच त्यांना विरोध म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करून अधिवेशनाला विरोध दर्शविलेला आहे. सीमा प्रश्नासंदर्भात मागील 70 वर्षांपासून अनेक आंदोलने व लढे झाले आहेत. मागील 70 वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समिती महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी केंद्र सरकारशी लढा देत आहे परंतु या लढ्याला यश न मिळाल्यामुळे 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सदर दावा दाखल झाल्यानंतर बेळगाव वर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने 2006 मध्ये हिवाळी अधिवेशन बेळगाव सुवर्णसौध येथे भरविले. कोणत्याही गोष्टीबद्दल न्यायालयीन दावा चालू असताना त्यांची परिस्थिती जैसे थे ठेवणे हे कायद्याने बंधनकारक आहे परंतु बेळगाव सीमा भागात कानडीचे प्रस्थ वाढविण्यासाठी कर्नाटक सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला दावा मजबूत करण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगाव सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशन घेण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी गेल्या 2009 मध्ये सुवर्ण सौध इमारत उभी करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या बेकायदेशीर कृतीला विरोध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. बेळगावसह सीमा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आले आहे. आज 70 वर्षे हा लढा अविरतपणे चालू आहे तरीदेखील सीमा वासियांची महाराष्ट्रात विलीन होण्याची इच्छा तसूभर देखील कमी झालेली नाही. बेळगावातील मराठी माणूस आपली मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो. बेळगाव मधील मराठी भाषा व संस्कृती पुसून टाकण्याचा कर्नाटक सरकारला कधी शक्य होणार नाही त्यासाठी कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्याचा उद्देश आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा महामेळावा मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा महामेळावा यशस्वी करावा असे आवाहन यावेळी मनोहर किनेकर यांनी केले.
बैठकीला आर. आय. पाटील, लक्ष्मण होनगेकर, आर. एम. चौगुले, आर. के. पाटील, मोनप्पा पाटील, अनिल पाटील, नारायण कालकुंद्री, कांतेश चलवेटकर, मोहन बेनके, विठ्ठल पाटील, महादेव परीट, विठ्ठल मजुकर, शिवाजी शिंदे, एम. जी. पाटील, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार मनोहर किनेकर यांचा काल तर समितीने ते रामचंद्र मोदगेकर यांचा आज वाढदिवस होता या उभयतांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी त्यांचा शाल व हार घालून वाढदिवस साजरा केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta